सकाळी लवकर जाग आली, उजाडायच्या आधीचं तांबुस वातावरण होतं. अंथरूनावर डोळे उघडले तेव्हा शांत होतं, उठून बाहेर येईस्तोवर हे गलका सुरु झाला. तसे १२-१३ प्रकारचे पक्षी दिसत असतात, पण त्यातल्या त्यात साळकाया माळकाया चिमण्यांचा राबता लय मोठा. लय म्हणजे एका वेळी ४०-५० चिमण्या आजूबाजूला उडताना, तावातावाने भांडताना दिसू लागतात. मी पराशरच्या परिसरातील औषधी वनस्पतींची पाने तोडून काढा बनवतो, ग्लासात घेऊन बाहेर येऊन बसतो. आताशी पानगळीचा ऋतू सुरु असल्याने, भरभर वाहणाऱ्या वाऱ्यासोबत निरगुडी, वड, पिंपर, कडूनिंब अन अशोकाच्या पोपटी पिवळ्या पानांचा सडा पडलेला दिसतो. सध्या ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे आजची सकाळ दवाची आहे. वातावरणात छान गारवा अन हलकासा भिजका वास आहे. हिरवळीवर जमा झालेल्या दवबिंदूंमध्ये चिमण्या आपलं तोंड घासुन जणु काय त्याही डोळ्यावर पाणी मारत असल्याचा भास होत आहे. मी वडाच्या पारावर बसलोय, सध्या माझ्या समोर दयाळ, नाचरा, बुलबुल, चीरक, सातभाई, चिमणी, कावळा, भारद्वाज, सूर्यपक्षी हे इकडून तिकडे उडत आहेत. या प्रत्येकाची हालचाल आपल्याच धुंदीतली दिसतेय. म्हणजे बघा ना, पराशर जणू काही चिडिया कॉलनी असल्यासारखं झालंय. कुडाच्या खोल्या असल्याने चिमण्यांना घरटी बनवायला जागाच जागा आहे. मग वळचणीला, ग्रामीण वस्तु संग्रहालयाच्या वस्तूंमध्ये, झाडावर, वेलीवर, आराश्याच्या मागे, किचनच्या दारावर सगळीकडेच काही जुनी घरटी दिसतायेत तर काही नवीन बांधकाम सुरुय. तोंडात काड्या घेऊन चिमणा चिमणी भिरभिर बघत असतात. जर मी अर्धा तास न हालचाल करता एकाच जागी बसून राहिलो तर हे माझ्याही डोक्यावर घरटे बांधायला कमी करायच्या नाहीत. अहिल्याचं अन या चिमण्यांचं वेगळंच भांडण आहे, अहिल्याला काही खाऊ दिला अन ती टेबलवर बसुन खात असेल तर एखादी चिमणी धाडस करून तिच्या जवळ येते. अहिल्याने काही केलं नाही तर तिच्या प्लेटच्या कडेवर बसून, तिच्या ताटातले पोहे चोचीत पकडून भुर्कन उडते. अहिल्या लुटुपुटीची रागवत येते. आई, चिमणीने माझे पोहे खाल्ले बघ. तिची समजूत काढण्यासाठी, तिच्या प्लेटमधले थोडे पोहे, चिमण्यांसाठी तिथेच टेबलवर पसरवायचे. काही सेकंदात १०-१२ चिमण्या पोहे टिपायला जमा होतात. मग अहिल्या आणि चिमण्या सोबतच नाष्टा करतात. अजून एक गंमत म्हणजे छोटु आणि चिमण्यांची मजा. छोटुला भाकर दिली कि तो भूक असेल तर लगेच खातो नाहीतर तशीच पडून देतो. पण मग जेव्हा छोटू खात नाही तेव्हा चिमण्या त्याची भाकर पळवून घेऊन जातात. कधीकधी तर खारुताई येऊन चीमण्यांनाही पळवून लावते अन स्वतःच भाकरीचा तुकडा लंपास करते. हि गोष्ट जेव्हा छोटूच्या लक्षात आली तेव्हा त्याने वेगळीच युक्ती शोधून काढली. त्याला जर भाकर खायची नसेल तर तो, ती तोंडात पकडून लांब घेउन जातो, तिथं पायाने छोटासा खड्डा उकरतो, त्यात भाकरीचा तुकडा लपवून ठेवतो अन जेव्हा भूक लागेल तेव्हा पुन्हा उकरून खायचा. चिमण्यांचा खेळ तासंतास बघत राहावा असा. हे चिमणी पुराण कधीही न संपणारे आहे. या चिमण्या जेवढ्या माणसाळल्यात तेवढाच भामटा कावळा आहे. कधी जवळ येणार नाही पण लांबून नजर ठेऊन असतो. दूरच्या बाभळीवर वस्तीला असतो. छोट्या पक्षांच्या घरट्यातील अंड्यांवर याचा डोळा. छोटुला दिलेल्या भाकरीवर त्याचं लक्ष जरी असलं तरी छोटू काही त्याला जवळ येऊ देत नाही. हा कावळा मला फार बेरकी आणि निलाजरा वाटतो. याला कितीही हुसका, हा आपला थोडं उडत जावून जवळच्याच फांदीवर बसणार. पावसाळ्यात बेडकं चोचीत पकडून, फांदीवर आपटत खाताना त्याला बऱ्याचदा पाहिलंय. घरी कोंबडी अंडी द्यायला बसली असली कि हे कावळे सुद्धा तेवढ्याच तन्मयतेने दबा धरून बसतात, कोंबडीने थोडी जरी हालचाल केली कि हे लगेच तिला उठवून लावणार अन ते कोवळं अंडं चोचीत पकडून घेऊन जाणार. कोंबडी आधी कि अंडं आधी या प्रश्नापेक्षा, ते अंडं उचलायला कावळा आधी कि मी आधी हा प्रश्न मला जास्त पडलेला असतो. इथला भारद्वाज म्हणजे साक्षात खानदानी कुलीनतेचा आविष्कारच जणु. कधी नारळाच्या झाडावर तर कधी चेरीच्या, कधी निरगुडीच्या शेंड्यावर तर कधी वडाची फळे खायला भारद्वाज नेहमीच आजूबाजूला वावरत असतो पण चुकूनही जवळ येणार नाही. छोटूची भाकर पळवणे असली चिल्लर कामे तर चुकूनही करणार नाही. त्याच्या नजरेतच तोरा आहे. पावसाळ्यात पक्षाचा वेगळाच आवाज यायचा. भारद्वाज तर दिसायचा पण त्याचा आवाज वाटायचा नाही. पावसाळ्यामुळे झाडी खुप त्यामुळे सहज दिसले नाही. पण बारीक बघितल्यावर लक्षात आले, भारद्वाज पक्षाने, दारासमोरच्या भल्या मोठ्या निरगुडीच्या झाडाच्या शेंड्याच्या झाडीत घरटे बांधले होते. तो वेगळा आवाज भारद्वाजाच्या पिल्लांचा होता. आईने चोचीत खाद्य आणले कि पिल्लं थोडी बाहेर यायची, खाद्य खाऊन पुन्हा आत जायची. जशी ती मोठी झाली तशी जवळच्याच फांद्यांवर उडताना पाहिली होती अन एक दिवस अचानक गायब झाली ती काही पुन्हा दिसली नाहीत. सकाळच्या कोवळ्या उन्हात जास्वंदीच्या फुलातला मकरंद, आपल्या लांबसर बाकदार चोचीने चोखुन घेण्याची कसरत हि सुर्यपक्षाची चुळबुळ. हे म्हणजे अजिबात शांत नाही. पाठीवर सोनेरी उन घेत यांचा रंग अजूनच चमकतो. यांचा वावर म्हणजे शेंड्या शेंड्यावर. असाच अजून एक तडतडा पक्षी म्हणजे नाचरा. हा गडी अजिबात शांतच नाही ओ, एखाद्यानं चंचल असावं तरी ते किती! चिमणीच्याच आकाराचं हे काळ्या रंगाचं पाखरू पण एकदम जपानी सुंदरीने हातात पंखा घेऊन स्वतःला वारा घालावा अशा अविर्भावात आपले पंख पसरवत असते. याचं दर्शन सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा वाटेल तेव्हा होतेच होते. याच्याच जोडीत जेव्हा चीरक आजूबाजूला उडताना दिसतो तेव्हा त्याच्या बायकोपेक्षा हाच जास्त सुंदर वाटतो. याने ग्रामीण वस्तूंच्या संग्रहालयातील एका वस्तूमध्ये आपलं वाटीसारखं घरटं बनवलं होतं, त्याचे अवशेष अजूनही आहेत. खुप वर्षांपूर्वी सुगरणीचा खोपा घेऊन आलो होतो एका विहिरीतून, असं आणायचं नसतं हे कळल्यापासून नाही आणला कधीच. पण जो आणला होता त्याच्या काड्या चिमण्यांनी घरटी बांधायला वापरल्या होत्या. मागे एकदा एका धनगर दादाकडून जान आणली होती छोटीशी. वर्षभरात त्याची लोकर कमी कमी होत गेली आणि २-३ वर्षात सगळी जानच गायब झाली. त्या काळात पराशरच्या परिसरात जेवढी घरटी झाली त्यात या लोकरीचा भरपूर उपयोग झाल्याचे दिसले. मागे एकदा रुमच्या पडवीतील वेलीमध्ये मुनिया आणि बुलबुल पक्षांनी शेजारी शेजारी घरटी केली होती. या बुलबुल कुटुंबाने अंडी देण्यापासून तर पिल्लं मोठी होऊन उडून जाण्यापर्यंतचा प्रवास अनुभवता आला होता. बुलबुलची पिल्लं उडून गेल्यानंतर ते निर्जीव घरटं मनाला उदास करून जायचं. अर्थात परिसरातील टनटनींची वाढलेली संख्या हे बुलबुलची वाढलेली चुळबुळच दाखवते. जेव्हा वातावरण शांत असेल तेव्हा अचानक एखादा सातभाई आवाज देतो अन मग त्यामागे जी काही ट्याआ.. ट्याआ चालू होते कि डोकंच उठतं. बाहेर येऊन बघावं ते हे असतात ३-४च पण आवाज तो केवढा! उगाच नाही यांना सातभाई म्हणत असतील. इथल्या दयाळ ने केळीच्या झाडांचा आसरा घेतलाय. यांच्या पोटाला असणारे पांढरे चट्टे यांची ओळख पटवायला मदत करतात. इथं चेरीची २-३ झाडं आहेत, त्याला छान चेरी लागल्यात. त्यामुळे खूप पक्षी त्याचा आस्वाद घ्यायला येत असतात. त्यात कोकीळही अगदी जोडीने दिसतो. सध्याच्या पानझडीच्या ऋतूमध्ये वडाची जुनी पानं पडून; लाल, पोपटी व नारंगी रंगाची मस्त पालवी फुटलीय. सकाळच्या अन संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात, हे रंग फारच खुलून दिसतात. सकाळच्या हर्बल टी सोबत अन संध्याकाळच्या गवती चहासोबत, निसर्गाची हि रंगपंचमी बघणं म्हणजे पर्वणीच. नुसती डोळ्यांनीच या रंगपंचमीचा अस्वाद घेत असताना, मागील आठवडाभर पराशर मध्ये पक्षांचं जणू काही स्नेह संमेलनच भरल्याचा फील आहे. मी कधीच न बघितलेले तांबट आणि चष्मेवाला मला या निमित्ताने बघायला मिळाले. पानझड होत असताना, वडाला आलेली फळे खायला अनेक पक्षी हजेरी लावत आहेत. त्यातले फारच कमी एकट्या दुकट्याने येतात. बऱ्याच जणांना मी जोडीने पाहिले आहे. नुसतं जोडीने नाही तर एकमेकांना घास भरवताना पाहिलंय. एरवी कोकीळचं अस्तित्व फ़क़्त आवाजानेच जाणवायचं आणि कधी दिसलाच तरी तो अगदी लांबवर असायचा. पण इथं वडाच्याजवळ बसुन तासंतास काळ्या रंगाचा कोकीळ आणि काळ्या पांढऱ्या रंगाची मादी यांना अगदी जवळून न्याहाळता येतंय. मी तर पहिल्यांदाच अनुभवतोय पण अहिल्याला सुद्धा कोकीळ नर मादी हे ओळखायला यायला लागलेत. तिला मादी कोकीळचा पंख हाताशी लागला, मला दाखवायला घेऊन आली, कोणाचा ग हा पंख तर म्हणे, आई कोकीळचा आहे. तांबट पक्षाचं दर्शन तर मला पहिल्यांदाच झालं. त्यांची रंगसंगती भारी, त्यांचा आवाज भारी..एकमेकाला भरवायची पद्धत भारी..मायला यांचं सगळंच भारी. एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करायला बुलबुल पण मागे नाहीत. तेही जोडीने येऊन फलाहार करतच आहेत. अजून एक वेगळा पक्षी मला इथं बघायला मिळाला अन तो म्हणजे चष्मेवाला,ते छोटंसं हिरव्या पोपटी रंगाचं पाखरू पाहून मोठी गंमत वाटली. वडाच्या फांदीला लटकून, अंगाला बाक देऊन पिकलेलं फळ, चोचीत बसेल एवढं तोडून खात राहायचं अन हे करताना आजूबाजूला भिरभिरती नजर ठेवायची, जिमनॅस्टिक्सचा अप्रतिम नजारा. गोलाकार डोळ्यात तशीच गोलाकार पांढरी रिंग आणि मध्यभागी काळा डॉट, डोळ्याच्या अशा रचनेमुळेच याला चष्मेवाला म्हणत असावेत. थोडक्यात काय तर या विविध पक्षांच्या स्नेह संमेलनाला निसर्गानेच फालाहारची सोय केलेली असावी. आणि अशा प्रेमळ वातावरणात त्यांना एकमेकाला घास भरवायचा मोह होत असावा. त्यांना बघून मीही नकळत नम्रताला चमचाभर पोहे भरवतो, शेवटी आपणही याच गोतावळ्याचा भाग आहोत नाही का. याचसोबत आजूबाजूचे कधीतरी वाट चुकून आत येणारे राखाडी धनेश, टिटवी, कोतवाल, पाकोळी, वेडा राघू, पारवा असेही पक्षिगण दर्शन देवून जातात. १० वर्षांपूर्वी पडीत असणाऱ्या या जागेवर कुसाळं सोडून काही उगवत नव्हतं. वरवर म्हणायला आम्ही झाडं लावली आणि निसर्गानं वाढवली. झाडोरा झाला आणि त्याच्या मागे निसर्गाचा जिवंतपणा आला, पक्षी आले. इतरवेळी डोळ्यांनी बघणं, त्यांना अनुभवणं व्हायचं. पण कोण कोणता हे काही माहित नव्हतं. किरण पुरंदरेंच्या “पक्षी-आपले सक्खे शेजारी” यातून तोंड ओळख झाली. आमचे आणि पक्षांचेही मित्र सुभाष कुचिक याने हि ओळख घोटून घेतली आणि याच्या पुढची कडी म्हणजे हे पक्षी आपल्या फोटोंमध्ये कैद करून आपल्यालाही दाखवायची संधी, यश मस्करे सरांनी उपलब्ध करून दिलीय. सरांना बहुतेक पक्षांचा डीएनए कळत असावा. त्यांची भाषा समजत असावी, त्यामुळेच फोटो काढताना सरांना छान पोज मिळते. जेव्हा या पक्षांचं गाणं निसर्गाच्या सुरात गाऊ लागतं तेव्हा नकळत आपलेही सूर लागतात. त्या सुरांची भैरवी कधी होऊच नये असं वाटतं. या सगळ्यांना इथं परिसरात, अंगणात माझ्या दारात पाहुन नकळत मनामध्ये शब्दांचे फेर सुरु होतात; सग्यांच्या साथीने, सोयरी वरात, माझीया दारात, विसावते; माझ्याच नादात, आताच्या क्षणात, आयुष्य माझे हे सुखावते.
मनोज हाडवळे,
पराशर कृषी व ग्रामीण संस्कृती पर्यटन
जुन्नर