द्राक्ष महोत्सव-२०१२ कुठेतरी वाचनात आलं. जरा कुतूहलाने पाहिलं तर जाणवले हे काहीतरी वेगळेच आहे. म्हणून जरा खोलात जाऊन पहिले तर भेट झाली, मनोज हाडवळे, एक सत्तावीस वर्षाचा युवक ज्याने साकारलंय १०० वर्षापूर्वीचे हुबेहूब गाव, पराशर कृषी पर्यटन, जुन्नर. हे उभारण्यामागची प्रेरणा, मेहनत, जिद्द आणि धडपड हे जेव्हा त्याच्याकडून ऐकलं तेव्हा थक्क व्हायला झालं. मनोजचे शिक्षण पदवीत्तर पदवी कृषी, तो जुन्नरमधील राजुरी या खेडेगावातील मुलगा. शेतकरी कुटुंबातील जन्म, गावची ओढ या मुळे लहान असल्यापासूनच मनोजला ग्रामीण संस्कृतीविषयी आपुलकी होती. फिरण्याच्या छंदामुळे आजूबाजूचे डोंगर मनोजने शाळेत असतानाच पालथे घातले होते. मनोजचे १० वि पर्यंतचे शिक्षण राजुरीतच झाले. पुढे ११,१२ साठी तो प्रवरानगरला रयतच्या कॉलेजमध्ये गेला. आणि पुढे कृषी पदवीसाठी जालन्याला. नंतर २ वर्ष पदव्युत्तर पदवी परभणी मध्ये आणि बँकेतील नोकरी वर्ध्याला. असं हा जवळपास १२ वर्षांचा प्रवास करून मनोजची पाउले पुन्हा गावाकडे, जुन्नरकडे वळायला लागली.
जरा बोलते केल्यावर सांगू लागला. शाळेत असताना मी साधारण विध्यार्थी होतो. तेव्हा माझ्यात आत्मविश्वासाची कमी होती. अभ्यास करत गेलो आणि पास होत गेलो पण जीवनाला असे काही ध्येय म्हणून नव्हते. शाळेत पहिले पाच म्हणजे पूर्ण वर्ग या मानसिकतेत वाढल्यामुळे स्वताच्या चांगल्या वाईट गोष्टींची कल्पनाच नव्हती. फिरण्याची, शेतीची आवड होती पण ती कामापुरतीच. घरी कामं करायचे, अभ्यास करायचा, आणि सुट्टीत मित्रासोबत आजूबाजूचे डोंगर फिरायचे. अशी परिस्थिती अगदी पदवीच्या पहिल्या वर्षा पर्यंत होती. आपण का जगतोय? जीवनाचे ध्येय काय? कुठ जायचं कशाचेच उत्तर माझाकडे नव्हते. आयुष्यात आपण काही करू शकू याविषयी मला कमालीचा न्यूनगंड होता.
पदवीच्या दुसऱ्या वर्षी असे काही बदल व्हायला सुरवात झाली कि माझ्या जगण्याला अर्थ यायला लागला, मला माझे उदिष्ट दिसायला लागले. हा महत्वपूर्ण बदल घडविण्यासाठी माझा भाऊ मंगेश हाडवळे [लेखक, दिग्दर्शक] कारणीभूत ठरला. त्याने मला विना गवाणकरांचे “एक होता कार्व्हर” हे पुस्तक भेट दिले [नंतर वीणाताई स्वतः पराशर कृषी पर्यटनाला भेट द्याला आल्या होत्या] आणि तिथून पुढे सर्वच बदलले. माझ्यात कार्व्हर हळू हळू भिनायला लागला होता. कॉलेजमध्ये असतानासुधा टेकडीवर जाऊन बिया पेरणे, कलम करून बघणं, वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती घेणं, परीक्षेसाठी अभ्यास करण्यापेक्षा ज्ञान मिळविण्यासाठी मी झटू लागलो. त्या वेळचे माझे शिक्षक डॉ भगवानराव कापसे ज्यांच्या आजही मी तेवढाच संपर्कात आहे यांच्या सोबत मी नेहमी चर्चा करत असे. जालन्यामध्ये जीरडगावात सरांनी गट शेतीचा प्रयोग राबविला होता, त्यवेळी मी त्यांच्या सोबत गावात जात असे. बाकीच्या मुलांना पण सहलीला आणूया या माझ्या बोलण्यावर सरांनी तत्काळ संमती दिली. ठरलं माझ्या कॉलेजची सहल गाव पाहायला निघाली होती. आम्ही दिवसभर खूप धमाल केली त्याच बरोबर मी अंतर्मुखही झालो. त्याचे कारण म्हणजे मुलांनी विचारलेले साधे साधे प्रश्न. माझ्या मनात विचार आला शेतकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मनात जर असे प्रश्न असतील तर आपल्या समाजात एक असा वर्ग नक्कीच असेल कि ज्याला हे काही माहीतच नसेल आणि त्याच बरोबर माहित करून घेण्याची इच्छा पण असेल. अशा लोकांसाठी भविष्यात आपण असे एखादे केंद्र नक्कीच उभारू जिथे सगळ्यांची जिज्ञासा शांत होईल. मला वाटतं कृषी पर्यटनाची पहिली ठिणगी तेथेच पडली असावी. माझ्या दृष्टीने शेती हा फ़क़्त व्यवसाय नाही, ती अखिल मानव जातीची संस्कृती आहे. या शेती संस्कृतीचे जतन, संवर्धन करणे हे एका कृषी पदवीधराचे कामच आहे असे समजून मी कामाला लगलो. जालन्याला कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आपला कापूस आणला होता, मी सहज फेरफटका मारायला तिकडे घुसलो आणि ते विदारक सत्य पाहून हादरून गेलो. त्यांचा कापूस घेतला जावा म्हणून चाललेली धडपड पाहून माझ्या मनावर आघात झाला आणि मनाची घालमेल कोणाला सांगावी म्हणून जवळ पडलेला कागद उचलला आणि माझी पहिली कविता बनली “पांढरा सोनं” [त्या नंतर वेळ मिळेल तसं 2०० पेक्षा जास्त कविता लिहून झाल्या आहेत]. शेतीविषयीची माझी स्वतःची मत बनत गेली. २००५ मध्ये B sc आणि २००७ मध्ये m sc पूर्ण झाली [या ६ वर्षात जागतिक हरित क्रांतीचे जनक डॉ नॉर्मन बोरलॉग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामीनाथन यांना भेटण्याचा, त्यांच्याशी चर्चा करण्याचा योग आला]. चार चौघांसारखी मलापण नोकरीची अशा होती, कॉलेज संपण्याच्या आधीच माझाकडे नोकरीच्या संधी अल्या होत्या. फ़क़्त पैसे कामाविण्यापेक्षा आपण घेतलेल्या शेतीच्या शिक्षणाचा उपयोग समाजाला कसा होईल याकडे माझा कल होता म्हणून मी कमी पगाराची पण शेतकऱ्यांना कामी येईल अशी एका खाजगी वित्त पुरवठा कंपनीत वर्ध्याला नोकरी घेतली. तेव्हा वर्धा हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त आत्महत्या होत असलेला तालुका होता. तिथे माझाकडे नाबार्ड चा खास विदर्भातील शेतकऱ्यांसाठी असलेला विकल्प प्रकल्पाचे काम देण्यात आले. पारंपारिक शेतीपेक्षा नगदी आणि शेती पूरक शेतीची माहिती आणि महत्व पटवून देण्याचे काम होते. हा प्रकल्प २० गावांमध्ये सुरु होता. तिथे गायीपालन, गटशेती, फळबाग लागवड, राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्र भेट, यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव असे विविध उपक्रम राबविण्यात आले. हे सर्व करत असताना खूप आधी पाहिलेले कृषी पर्यटनाचे स्वप्न अधून मधून उचल खात होते. त्या स्वप्नात आता जुन्नर पर्यटनाची पण भर पडली होती. जुन्नरमध्ये असणारा निसर्ग, प्राचीन इतिहास, समृद्ध घाटमाथा, किल्ले लेण्या मला खुणावत होत्या. पुन्हा जुन्नरला जाण्याचा विचार सुरु झाला. दरम्यान स्टेट बँकेची जाहिरात आली आणि विपणन व वसुली अधिकारी म्हणून माझी निवड पण झाली. पण पोस्टिंग पुन्हा वर्ध्यातच मिळाले आणि स्वप्न सत्यात उतरायला थोडं लांबणीवर पडले. बँकेतील २ वर्षाच्या काळात मी भारत, भारताची संस्कृती, कला, विज्ञान यावर जमेल तसा अभ्यास करून “भारतवर्ष दर्शनम” हा ७०० पानी प्रबंध लिहिला. राजस्थान मध्ये तो प्रबंध सत्यात उतरविण्यासाठी असफल प्रयत्न करून पहिले. कदाचित भारतवर्ष दर्शनम साठी जुन्नरची भूमीच वाट पाहत असावी. वर्ध्याला असताना सुद्धा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम, विनोबा भावेंचा पावणार आश्रम इथे वेळ मिळेल तेव्हा मी जाऊन बसत असे. काही दिवस असेच गेले. मन स्वस्थ बसेना. पाहिलेले स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आतून धडका मारत होते, मी इतक्या दिवस थोपवले पण आता थांबायला तयार नव्हते. मी विचार केला हीच योग्य वेळ आहे आता नाही तर कधीच नाही म्हणत मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. घरी चर्चा केली आई-वडील, भावांनी माझे ऐकून मला पूर्ण साथ दिली आणि शेवटी मे २०१० रोजी मी नोकरी सोडली. एक मळलेली वाट सोडून मी स्वतःची वाट तयार करण्यासाठी कंबर कसली. डोक्यात खूप काही आधीपासूनच ठरविलेले होते. पण कल्पना सत्यात उतरविण्यासाठी वास्तवाचे भान असावे लागते.
कुठल्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याचा स्वभाव असल्यामुळे, जुन्नर पर्यटन सुरु करायचे आहे तर सर्व माहिती घ्यायला हवी म्हणून वर्षभर शक्य होईल तेवढा जुन्नर फिरलो. जुन्नरचे लोकजीवन, शेती कशी आहे, जुन्नरमध्ये असलेल्या लेण्या, किल्ले, घाट, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, भौगोलिक वैशिष्टे, धरणे, गावोगावी असणारी वैशिष्ट्ये, आठवडी बाजार या सगळ्यांची माहिती जमा केली. हि माहिती जमा करत असताना कधी जुन्नर दर्शन चा प्रकल्प तयार झाला मला कळलेही नाही. माझ्या सर्वेक्षणानुसार जुन्नरमध्ये १७ प्रकारचे पर्यटन शक्य आहे. मला जाणीव होती हे एकट्याचे काम नाही म्हणून समविचारी आणि आवड असलेली मित्र मंडळी तसेच जाणकार व्यक्तींचा समावेश करून “जुन्नर पर्यटन विकास संस्था” या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. तसेच जुन्नरमधील पर्यटन वैभव जगाच्या कानाकोपऱ्यात माहित व्हावे, जगभरातून पर्यटकांनी माझा जुन्नर पाहायला यावे म्हणून “हचीको टुरिझम” हि कंपनी स्थापन केली. जुन्नर पर्यटनाची सुरवात अर्थातच कृषी आणि ग्रामीण पर्यटनापासून होणार होती. ११ वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरायला लागले होते. त्यासाठी मी माझे परतीचे दोर कापले होते. आता पुढे आणि फ़क़्त पुढेच जायचे होते. कृषी संस्कृती किती जुनी आहे हे जाणून घेण्यासाठी मी महिनाभर पुण्यात भांडारकर संग्रहालयात बसत होतो. तिथेच मला “कृषी पराशर” हा ग्रंथ सापडला, मी तो वाचून काढला आणि थक्क झालो. ज्या परदेशी लेखकांची पुस्तके वाचून मी पास झालो त्यांच्या पेक्षाही कितीतरी प्रगत असे शेतीचे तंत्रज्ञान हजारो वर्षांपूर्वी पराशर ऋषींनी लिहुन ठेवले आहे. योगायोगाने जुन्नर हि पराशर ऋषींची तपोभूमी. मग जर जुन्नरमध्ये कृषी पर्यटन उभे राहणारच असेल तर याच नावाने का नको म्हणून एका आद्य कृषी संस्थापकाला आदरांजली म्हणून “पराशर कृषी पर्यटन, जुन्नर” राजुरी गावामध्ये उभे राहिले. शिवाय हैदराबाद वरून ती सर्व प्राचीन ग्रंथ संपदा मी मागून घेतली आणि आपल्या कृषी पर्यटन केंद्रावरील वाचनालयात ठेवली आहे. महाराष्ट्रात कृषी पर्यटन केंद्रे खूप आहेत माझ्या कल्पनेतील कृषी पर्यटन केंद्रात थेट शेतकऱ्यांचा सहभाग अपेक्षित होता. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून त्यांच्या शेतमालाला एक बाजरपेठ त्यांच्या बांधावर आणण्याचा संकल्प मी सोडला होता. मी परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करून माझी संकल्पना सांगितली आणि त्यांना पण रुचली. १० एप्रिल २०११ रोजी महाराष्ट्रातील पहिला द्राक्ष महोत्सव आपण आयोजित केला आणि पर्यटकांचा त्यास भरघोस प्रतिसाद मिळाला. ५ दिवसात जवळपास ३५० पर्यटकांनी पराशर कृषी पर्यटन केंद्राला भेट दिली, शेतात जाऊन द्राक्ष खाण्याचा मनसोक्त आनंद लुटला, ग्रामीण जनजीवन अनुभवले आणि शेतकऱ्यांना पण त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळाली. सुरवातीलाच असा प्रतिसाद मिळाल्यावर माझा आत्मविश्वास अजून वाढला. तोपर्यंत मुक्कामी व्यवस्था नव्हती. आलेल्या पाहुण्यांच्या आग्रहास्तव राहण्याची व्यवस्था उभे करण्याचे ठरले. राहण्याची व्यवस्था उभारताना काही गोष्टीवर मी जोर दिला. एकतर सगळी रचना अस्सल ग्रामीण पद्धतीची हवी, त्या ठिकाणी आल्यानंतर शेतीचे, गावचे खरेखुरे दर्शन आणि अनुभव पाहुण्यांना यायला हवा तसेच हे ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात हवे म्हणून मी जमिनीची शोधाशोध करू लागलो. मला शेती योग्य नसलेली, निसर्गाच्या सानिध्यात असलेली पडीत जमीन हवी होती. बराच शोधशोध केल्यावर एक एकर जमीन मिळाली जी ११ वर्षाच्या भाडे तत्वावर घेतली आहे. जमीन तर मिळाली आता उभे करण्यासाठी पैसे? मग गावातीलच पतसंस्थेत कर्ज काढले आणि कामाला सुरवात झाली. मंगेश हाडवळे “टिंग्या चे लेखक दिग्दर्शक” आणि मोहन हाडवळे या मोठ्या भावांची हे सर्व उभारताना भरपूर मदत झाली, मंगेशच्या कलात्मकतेला मोहन ची व्यावहारिकपणाची जोड मिळाली आणि माझे काम सुकर झाले. मे २०११ ला काम सुरु झाले आणि सप्टेंबर २०११ पूर्ण झाले. एकूण ५० पाहुणे एकावेळी राहू शकतील अशा ८ स्वतंत्र खोल्या आणि १ मोठा हॉल तयार झाला. ४ सप्टेंबर ला मा.आमदार वल्लभशेठ बेनके साहेबांच्या हस्ते उद्घाटन झाले. पराशर कृषी पर्यटन केंद्रावर आपण काही नियम आधीपासूनच पाळले ते म्हणजे मासाहार, धुम्रपान, दारूसेवन या सगळ्याला बंदी घालण्यात आली. शेणाने सारवलेल्या जमिनी, अद्यावत सुविधांनी सुसज्ज अशी राहण्याची व्यवस्था, पांघरण्यासाठी बचत गटांकडून शिवून घेतलेल्या गोधड्या, आणि आईच्या हातची खास ग्रामीण जेवणाची सात्विक चव, सोबतीला शेती अवजारांचे संग्रहालय, विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचनालय, पराशर ऋषींची पर्णकुटी, ध्यानकेंद्र, मुलांना खेळण्यासाठी झोके, मचाण, विटी दांडू सारखे खेळ, बैलगाडीची रपेट आणि पर्यटकांना शिवार फेरी करण्यासाठी खास बनविलेली ट्रक्टर-ट्रोली. राष्ट्रीय महामार्ग २२२ कल्याण-विशाखापट्टणम वर आलेफात्याजवळ राजुरी मध्ये २ कि मी आतमध्ये हे ठिकाण आहे त्यामुळे रस्त्याची अडचण नाही. तसेच पराशर कृषी पर्यटन केंद्राच्या ३५ कि मी परिसरात ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिर, ओझर, लेण्याद्री, शिवनेरी, जगातील सर्वात मोठी दुर्बिण,खोडद, रांजणखळगे, निघोज. आणे घाट, प्रसिध्द बैलबाजार, अशी खूप सारी प्रेक्षणीय स्थळे आहेत. हे सर्व पर्यटन वैभव पाहायला, कृषी संस्कृतीचा आनंद लुटायला, डोंगर कपारी चढायला, वनभोजन घ्यायला, गाव पाहायला रात्र्चीच्या मुक्कामात जागरण, गोंधळ, भारुड यासारख्या लोककलेचा आनंद घ्यायला आणि ग्रामीण जेवणाची तृप्त चव चाखायला मोठ्या संख्येने वेगवेगळया वयोगटातील पाहुणे येत असतात. या वर्षी पण द्राक्ष महोत्सव जोरात सुरु आहे. मे महिन्यात आपण एका “कुतूहल शिबिराचे” आयोजन केले आहे ज्यामध्ये मुलांना मोठ्यांना असणारे शेतीचे, गावाचे, निसर्गाचे, इतिहासाचे, भूगोलाचे कुतूहल गमतीशीरपणे सांगितले जाणार आहे. मुलांसोबत ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा पण चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आपण फ़क़्त राहण्याची जागा उभारून शहरी पाहुणे आणि गावातील शेतकऱ्यांचे आदरतिथ्य यासाठी एक व्यासपीठ उभे करून दिले आहे. ज्या शहरी पाहुण्यांना स्वतःचे गाव नाही, शेती नाही त्यांनी खुशाल पराशर कृषी पर्यटन केंद्रावर यावे, शेतांमध्ये फिरावें, गाव पहावे, हवे तितके दिवस राहावे, रानमेवा चाखावा आणि सोबत घेऊन पण जावा. जेव्हा शहरी पाहुणा म्हणतो भाऊ, काय मस्त शेती फुलवली आहे तेव्हा त्या शेतकऱ्याचा कामाचा उत्साह द्विगुणीत होऊन अजून जोमाने तो कामाला लागतो तसेच पाहुणे जो भाजीपाला, फळफळावळ, धान्य शेतकऱ्याकडून विकत न्हेतात त्यांनाही दोन पैसे मिळतात म्हणून ते खुश आणि ताजा भाजीपाला आपण थेट शेतातून घेतला याचा आनंद घेत पाहुणे पण खुश. पराशर कृषी पर्यटनाची सुरवात झालेले आता वर्ष होईल..हळू हळू लोकांना माहित होत आहे. अजून खूप गोष्टी करायचे डोक्यात आहे. या माध्यमातून एक चांगली बाजारपेठ उभी करण्याचा मनोदय आहे कि ज्यातून सगळ्यांचाच फायदा होईल.
कृषी पर्यटन सोबतच जुन्नरचे सर्वागीण पर्यटन वैभव घेऊन आपण लोकापर्यंत पोहोचत आहोत. काही पाहुणे खास जुन्नर पाहण्यासाठी येत असतात. जुन्नर मध्ये औद्योगिक वसाहत होणार नाही म्हणजे इथली मोकळी शुद्ध हवा हि वर्षानुवर्षे अशीच राहील आणि वाढत्या प्रदूषणा सोबत इथल्या शुद्ध हवेचे महत्व अजूनच वाढत जाईल. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून जुन्नरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. केवळ वर्षभरातच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पराशर कृषी पर्यटन, जुन्नर ला नोंदणी कृत केंद्र बनविले तसेच OUTLOOK TRAVELLER या मासिकाने ग्रामीण पर्यटनासाठी भारतातील १० जागा निवडल्या त्यात परशर कृषी पर्यटन, जुन्नर ला पहिली पसंती दिली. साहित्य कला, क्रीडा, चित्रपट, राजकीय,, सामाजिक अशा वेगवेगळया क्षेत्रातील लोकांनी पराशर कृषी पर्यटन केंद्राला भेट दिली. १६ मे य जागतिक कृषी पर्यटन दिनाच्या दिवशी पराशर ला “जागतिक कृषी पर्यटन गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वेगवेगळया कृषी पर्यटन प्रशिक्षण वर्गांमध्ये व्याख्यानासाठी बोलाविले जाऊ लागले. जसा पर्यटकांचा ओघ महाबळेश्वर, माथेरान ला जातो तसाच पर्यटकांचा ओघ जुन्नरला आणायचाय. पण हे माझ्या एकट्याचे काम नाही त्यासाठी एक चळवळ उभी राहावी लागेल. सगळ्याच गोष्टी शासनाकडून शक्य नाही. यात शासन, लोकसहभाग असा सर्वसमावेशक कार्यक्रम हवा आहे. पण तोपर्यंत का थांबा.. सुरवात तर करुया.
अजून खूप काही करायचय, आताशी कुठे सुरवात झालीय..खूप वर्षांपूर्वी एक ठिणगी पडली होती. त्यावर वेळोवेळी जमेल तशी सगळ्यांनीच फुकर घातली आणि ती नेहमी जळत ठेवली..त्या ठिणगीची मशाल करायची आहे