जगाच्या पाठीवर असा माणुस सापडणे म्हणजे विरळाच कि ज्याला फिरायला आवडत नाही, पर्यटनाला जायला आवडत नाही. माणुस नेहमीच आनंदाच्या शोधात, नाविन्याच्या शोधात आणि वेगळेपणाच्या अनुभवासाठी फिरत असतो. या फिरण्यालाच सुव्यवस्थितपणे चालविणारी यंत्रणा म्हणजे पर्यटन उद्योग. जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक, नैसर्गिक वैभव पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी पर्यटक मंडळी जगभ्रमंती करत असतात. आपण जर भारताचा विचार केला तर इथल्या सामाजिक आणि आर्थिक स्तरामधली विविधता इथे पर्यटनाच्या वेगवेगळ्या चवी विकसित करते. आपल्याकडे धार्मिक पर्यटन मोठ्याप्रमाणात होते, त्याला खरतर पर्यटनापेक्षा तीर्थयात्रेचे स्वरूप जास्त असते कारण पर्यटन हि उरकण्याची गोष्ट नसुन अनुभवण्याची गोष्ट आहे. भारतातील थंड हवेची ठिकाणे, समुद्र किनारे, वेगवेगळी उद्याने, किल्ले, लेण्या, प्राचीन मंदिरे, नैसर्गिक पठारे या आणि अशा विविध स्थळांच्या आसऱ्याने पर्यटन व्यावसाय वृद्धीस पावला आहे. बऱ्याचदा भारतीय पर्यटक या अशा स्थळांना भेट देताना काय करतो? तर तिथे जावून आल्याचे पुरावे म्हणून फोटो काढून आणतो पण अशा ठिकाणांना भेट देत असताना तिथली हवा, स्थानिक खाद्यसंस्कृती, लोकसंस्कृती, स्थानिक बाजारपेठेची वैशिष्ट्ये, ज्या पर्यटन स्थळाला भेट देत आहोत त्याविषयीची ऐतिहासिक, नैसर्गिक, भौगोलिक अशा विविध अंगाने घेतलेली माहिती याचाही अनुभव घ्यायचा असतो आणि मुळात ते पर्यटन स्थळ स्वच्छ ठेवायचे असते, जपायचे असते असे अनुभव सिद्ध जबाबदार पर्यटन हाही एक पर्यटनाचाच भाग आहे हे आपल्या खिजगणतीतही नसते. मग साधारणपणे अशा प्रकारच्या पर्यटकांच्या मागणीचा पुरवठा करायला स्थानिक बाजारपेठही आपली स्थानिक वैशिष्ट्य जपण्यापेक्षा लोकांना जे हवे ते उपलब्ध करून देण्यात धन्यता मानतात. आणि मग पर्यटकांच्या रुचीला अभिरुचीमध्ये रुपांतरीत करून, सजगपणे त्यांच्या जाणीवा समृद्ध करत त्याचसोबत पर्यटन स्थळांचेहि संवर्धन करणे त्यांना जपणे या गोष्टी फ़क़्त कल्पनेतच राहतात. जेव्हा परदेशी पर्यटक भारतात येतात तेव्हा त्यांच्यातील अनुभवसिद्ध जबाबदार पर्यटनाचा पैलू प्रकर्षाने जाणवतो. आपल्याकडे त्याची रुजवात होण्यास सुरवात झालीय, पल्ला लांबचा आहे पण अशक्य नाही. कारण आपल्याकडील आर्थिक कसोटीवर अवलंबून असलेला वैचारिक आणि सामाजिक प्रवासाचा पल्लाही तितकाच मोठा आहे.
या पार्श्वभूमीवर भारतातील पर्यटन व्यवसाय आणि त्यातील नवनवीन संकल्पना यांचा विचार करता काही गोष्टींवर आपल्याला प्रकाश टाकावा लागेल. भारतात बर्फ आहे, वाळवंट आहे, समुद्र किनारा आहे, हिरवेगार डोंगर आहेत, घनदाट जंगले आणि त्यातील वन्यजीव आहेत, फुलांनी सजलेली पठारे आहेत, प्राचीन मंदिरे आहेत, तितकेच जुने कोरीव लेणी वैभव आहे, अध्यात्म, आयुर्वेद आणि योगाची परंपरा आहे, साहित्य आणि तत्वज्ञानाचा वारसा आहे, प्राचीन इतिहास आहे, संस्कृती आहे, सन उत्सव आहेत. त्याचसोबत भारत हा कृषी प्रधान देश आहे,इथे शेती हा फ़क़्त व्यवसाय नाही तर जीवनपद्धती आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ४८% लोकसंख्या हि रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहे बदल्यात राष्ट्रीय सकल उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा हा १३% आहे. याउलट एकूण लोकसंख्येच्या १०% टक्के लोकसंख्या रोजगारासाठी पर्यटनावर अवलंबून आहे तर बदल्यात राष्ट्रीय सकल उत्पन्नात पर्यटनाचा वाटा ६% आहे. जेव्हा ६०% पेक्षा जास्त लोकसंख्या गावखेड्यात रहात आहे तेव्हा वरती नमूद केलेले भारतातील विविध नैसर्गिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, भौगोलिक विविधतेने नटलेले वैभव आणि गाव, शेती यांचा पर्यटनाच्या नजरेतून विचार करता पर्यटनातील नवीन संकल्पना, पर्यटनातून रोजगार आणि संधी आपल्या लक्षात येऊ शकतील. वर्षानुवर्षांपासून खूप साऱ्या टूर कंपन्या भारतातील तसेच भारताबाहेरील पर्यटन स्थळांना सहलींचे आयोजन करतात तसेच भारतातील पर्यटकांना देशांतर्गत पर्यटन किव्हा परदेशातील पर्यटकांना भारतीय पर्यटन स्थळांच्या पर्यटन सहली असेही आयोजन केले जाते. भारतात इतकी विविधता असतानाही काही ठराविक प्रकारचे आणि ठराविक ठिकाणचेच पर्यटन वाढले आहे आणि मग पर्यटनातही तोचतोचपणा येऊ लागलाय, पर्यटक नाविन्याच्या शोधात अनुभवसिद्ध पर्यटनासाठी काही नवीन ठिकाणांचा आणि नवीन पर्यटन संकल्पनांचा शोध घेत आहेत आणि जिथे कुठे नाविन्यपूर्ण पर्यटन संकल्पना सुरु झाल्या आहेत तिथे हळू हळू ओघ वाढत आहे. भारताची लोकसंख्या आणि वेगवेगळे आर्थिक सामाजिक स्तर हे इथल्या विविध पर्यटन संकल्पनांची मोठी बाजारपेठ आहे तसेच या नवनवीन पर्यटन संकल्पना परदेशी पर्यटकांनाही खुणावणाऱ्या आहेत.
शेती—गाव—आठवडी बाजार आणि पर्यटन
वरती नमूद केल्याप्रमाणे ६०% पेक्षा जास्त लोक हे गावखेड्यात राहतात, ते शेती आणि शेती पूरक व्यवसाय करतात, त्यांनी शेती आणि शेती पूरक व्यवसायातून उत्पादित केलेला माल हा आठवडी बाजारात विकला जातो आणि शहरी बाजारपेठांनाही पाठवला जातो. गावात राहून शेती करत आठवडी बाजारात देवाणघेवाण असणारी हि एक जीवनपद्धती आहे. शेती, गाव आणि आठवडी बाजार हे एकाच जीवन पद्धतीचे घटक जरी असले तरी आपापले वेगळेपण टीकवून आहेत. इंडियात राहणाऱ्या लोकांसाठी अन्नधान्य पिकविणारी यंत्रणा भारतात रहाते आणि भारतातील अन्नधान्या उत्पादनाला यंत्रसामग्री उपलब्ध करून देणारी यंत्रणा हि काही अंशी इंडियात रहाते. भारतातील लोकांना इंडिया अनुभवण्याचे अप्रूप आहेच पण इंडियातील लोकांचे पर्यटन हे आतापर्यंत इंडीयाबाहेरच होत आले आहे. कारण त्यांना आतापर्यंत “भारतात” काही बघण्यासारखे आहे, अनुभवण्यासारखे आहे हेच सांगितले नाही. अशी परिस्थिती काही वर्षांपूर्वीपर्यंत होती. आता खूप सकारात्मक बदल होत आहेत.सुरवात जरी थोड्यापासून झाली असली तरी आता इंडियातील लोकांना भारत अनुभवण्याची इच्छा म्हणा किव्हा गरज म्हणा पण भारतात घेऊन येऊ लागली आहे हे नक्की. मग शेती, गाव आणि आठवडी बाजार हे भारतातील घटक आहेत त्यांना अनुभवायचे म्हणजे नेमके काय करायचे?
शेती पर्यटन/कृषी पर्यटन
आपण जे अन्न खातो ते बनते कसे? भोपळ्याचा वेल असतो कि झाड असते, टोमटो लालच का? मिरची तिखट का लागते? मातीचा वास का येतो? एक बी मातीआड केले कि त्याचे झाड कसे बनते? फुलं कशी येतात? फळ कसे बनते? फळांमध्ये गोडवा, आंबटपणा, तुरटपणा कुठून येतो? काही भाज्या हिरव्या तर पिवळ्या कशा असतात? आधीची हिरवी कैरी नंतर पिवळी कशी होते? चारा कसा लावतात? गायीच्या पोटात दुध कसे बनते? गाय दुध कशी देते? म्हटलं तर माती, पण तीच माती एवढ्या वेगवेगळ्या रंगांची कशी असते? मुळात माती बनतेच कशी? अन्न पिकविणारा अन्नदाता शेतकरी दिवसभर काय काय करतो? तो रहातो कसा? कुठे? काय खातो काय पितो? त्याचं घर कसं असत? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतील तर आपल्याला शेताच्या बांधावर, शेतात, शेतकऱ्याच्या घरी जावे लागेल, त्याच्यासोबत रहावे लागले, खावे प्यावे लागेल. आता हे सगळं करायचं तर तो त्याचे हातातले काम सोडून तुम्हाला वेळ का बर देईल? मग तुम्हाला शेती दाखविण्याच्या बदल्यात त्यालाही मोबदला मिळाला तर तेच काम तो मोठ्या आनंदाने करेल. शेतात जायचं, शेतीसंस्कृती समजून घ्यायची, निसर्गाच्या अंतरंगात डोकवायचे आणि शेतीतील सृजनशीलता अनुभवायची यालाच म्हणतात कृषी पर्यटन. पूर्वी शहरातली पाहुणे मंडळी गावाकडच्या पाहुण्यांकडे शेत फिरायला यायची आणि सोबत शेतातील वानावळ्यासोबत गोड अशा आठवणी सोबत घेऊन जायची पण काळाच्या ओघात शहरे आणि गावे दूर दूर जात गेली आणि तशी हि जुनीच संकल्पना पण एक गरज म्हणुन व्यवसायिक रुपात नव्याने समोर आली. कृषी पर्यटनाची सुरवात जगामध्ये ऑस्ट्रेलियात झाली आणि भारतामध्ये महाराष्ट्रात झाली आणि आता ती देशभर फोफावत आहे.महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्रे विकसित झालेली आपल्याला अनुभवायला मिळतील. तसेच उर्वरित महाराष्ट्रातही आता हे ग्रामीण पर्यटनाचे बीज रुजू लागले आहे. जुन्नरमधील पराशर कृषी व ग्रामीण पर्यटन सारख्या अनेक पर्यटन केंद्रांवर भारतासोबतच परदेशातूनही पर्यटक मंडळी ग्रामीण भारत अनुभवायला येत असतात.
गाव पर्यटन
“गाव करील ते राव काय करील” अशा आशयाची एक म्हण आहे यातच गावाचे महत्व लक्षात येते. गाव म्हणजे सामाजिक सलोख्याचे, वादव्यवहाराचे आणि शिक्षणाचे व्यासपीठ. सध्या क्याशलेस इकॉनॉमी चे जे महत्व सांगितले जातेय ते फार वर्षापूर्वी या गावांमध्ये प्रत्यक्ष व्यवहारात होते. बलुतेदारी आणि अलुतेदारीत एकमेकांकडील वस्तूंच्या देवाणघेवाणीतून व्यवहार चालत असे तिथे पैशाला फारच कमी महत्व असायचे. महात्मा गांधींनी पण सांगितले होते कि खरा भारत समजून घ्यायचा असेल तर खेड्याकडे चला. मग हे गाव खेडं आहे तरी कुठं? तुमच्या शहरापासून म्हटलं तर हाकेच्या अंतरावर नाहीतर तर शेकडो किमी वर. गावात जायचं, गावातील शिक्षणव्यवस्था, वित्तपुरवठा व्यवस्था, समाजव्यवस्था, जातीव्यवस्था, चावडी, वैचारिक बैठक, बलुतेदार, अलुतेदार, गावाची रचना, आळ्या, जुनी मंदिरे, वाडे, घरे, असल्यास नदीचा घाट, गावाची खाद्यसंस्कृती, काही खासियत, गावचा विविध क्षेत्रातील वारसा, यात्रा उत्सव, साप्ताह सोहळे या सगळ्याचा अनुभव घेणे म्हणजे गाव पर्यटन होय. जसे गावाकडच्या माणसांना शहराचे आकर्षण असते असेच आकर्षण शहरातल्या माणसांना गावाविषयी वाटत असते, बरेच समज गैरसमज असतात. गाव हि संकल्पना समजून घेणे म्हणजे देशाचा अभ्यास केल्यासारखे आहे. जुन्नरमध्ये हचीको टुरिझम च्या माध्यमातून अशा प्रकारचे गाव पर्यटन केले जाते. गाव आहे, गाव पाहण्यासाठी इच्छुक मंडळी आहेत, गरज आहे त्याचे व्यवस्थापन करण्याची.
आठवडी बाजार पर्यटन
आठवडी बाजार म्हणजे एखाद्या मोठ्या गावात भरणारा बाजार, ज्या गावाला आजूबाजूच्या २०-३० वाड्या वस्त्या जोडलेल्या असतात, अशा वाड्या वस्त्यांचे लोकं स्वतःकडे असणारा शेतमाल व इतर गोष्टी विकायला बाजारात आणतात आणि बदल्यात त्यांच्या गरजेच्या वस्तु विकत घेऊन जातात. आठवडी बाजारात गायी, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या, शेती अवजारे, रोपे, बांबूच्या टोपल्या, भाजीपाला, फळे, किराणा दुकाने, मास मच्छी ची दुकाने, कपड्याची दुकाने, हॉटेल्स, काठानकुठान विकायला आणलेल्या वस्तु, असा सगळा रंगीबेरंगी बाज असतो. रंगीबेरंगी कपडे घातलेल्या स्त्रिया आणि पुरुष, तितकीच रंगांची उधळण करत असलेली दुकाने सोबतीला बाजारची खाद्यसंस्कृती आणि तोंडी लावायला बाजारगप्पा. एक दुपार जर बाजारात फेरफटका मारला तर भारताच्या अंतर्गांतील इंद्रधनुषी छटा आपल्या आठवणींच्या पटलावर कायमच्या कोरल्या जातात. तसं तर प्रत्येक जिल्हा तालुक्यात, गावोगावी आठवडी बाजार हे भरतच असतात. जुन्नरमधील बेल्हे गावचा आठवडी बाजार हा खूप गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. एकतर इथली खाद्यसंस्कृती ज्याचा आस्वाद घेण्यासाठी अगदी १०० किमी वरून खवय्ये मंडळी येत असतात त्याचसोबत अनेक प्रथितयश लेखकांनी याविषयी लिहिले आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा या सोमवारच्या बैलबाजारात “टिंग्या” चित्रपटाचे शुटींग झाले आहे. खवय्ये मंडळी, हौशी मंडळी, छायाचीत्रकार मंडळी, ग्रामीण बाजारपेठेच्या अभ्यासाला येणारे व्यवस्थापनाचे विद्यार्थी यांना हचीको टुरिझम च्या माध्यमातून आठवडी बाजारचा अनुभव घेता येतो. असे बाजार गावोगावी आहेत, गरज आहे पर्यटकांनी तिथे जाण्याची आणि पर्यटकांना तिथे घेऊन जाण्याची.
शेती गाव आठवडी बाजार यांचा पर्यटनाच्या नजरेतून विचार करता एक लक्षात येते कि या सगळ्या तशा जुन्याच गोष्टी पण जगण्याची नाळ जीवनाशी जोडायची म्हणुन त्यांना नव्यानेच पर्यटन संकल्पनेत घालुन लोकांपर्यंत मांडायचे आहे.
मनोज हाडवळे