आपल्या पराशरच्या परिसरामध्ये खूप प्रकारचे पक्षी येत असतात, एका पडीत जमिनीच्या तुकड्यावर माझ्यासारखेच तेही निसर्गाच्या आसऱ्याला आलेले आहेत. मग प्रत्येक पक्षी आपापल्या विणीच्या हंगामात, आपापल्या पद्धतीने निवाऱ्याची व्यवस्था करताना दिसतो. पराशरमध्ये मुनिया, चिमणी, कावळा, भारद्वाज, शिंजीर, बुलबुल या पक्षांची, घरं बांधताना आणि त्यात हे पक्षी अंडी घालून त्यांना उबवून, त्यांच्या पिलांना पंखांमध्ये बळ घेऊन आकाशात भरारी मारताना कित्येकदा बघितलं आहे. यावेळेस त्यात पारव्याची भर पडली. म्हणजे काय झालं, इथं एक छोटासा गोठा आहे. त्यात आधी गाय आणि तिचे वासरु असायचं. आता त्यात बकरी आणि तिचे पिल्लू असतं.बिबट्या पासून संरक्षण करण्यासाठी, त्याच गोठ्याच्या चारी बाजूने जाळी लावलेली आहे, तसेच तिन्ही बाजूनी ताट्या आहेत. दक्षिणेकडच्या ताटीवर दोन पारवे चलबिचल करताना दिसले, बकरीला खाऊपिऊ घालण्यासाठी दिवसातल्या चार-पाच चकरा तरी तिकडे होतात. तसही हा गोठा, घराजवळच असल्याने इतर वेळीही गोठ्याकडे लक्ष राहते. तिकडं गेलं की पारवे घाबरून उडून जायचे, सुरुवातीला लक्षात आलं नाही पण नंतर दक्षिणेकडच्या ताटीवर, काही काड्या दिसायला सुरुवात झाली. अंदाज बांधला की इथं माझ्या घरासारखंच एक घर बांधलं जात आहे. मग शक्य होईल तितकं कमी डिस्टर्ब करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. पण काही गोष्टी टाळता येत नव्हत्या, निसर्गचक्राचा भाग म्हणून पारवेही त्याला सरावतील असं मनातून वाटायचं. नाहीतरी बकरीचा आवाज हा त्यांचं साऊंड हार्डनिंग करण्यासाठी पुरेसा होता. दोन दिवसातच बऱ्यापैकी काड्या जमल्या आणि बशीच्या आकाराचं छोटंसं घरटं तयार झालं. ये-जा करणाऱ्या 2 पैकी एक कायमचा घरट्यात बसलेला दिसला, ती आई होती. मी आपलं गपचूप जाऊन बकरीला खायला घालून बाहेर आलो. पण तरीही आई उठली, मला अपराध्यासारखं वाटलं. मी गोठ्यातून बाहेर आलो, थोड्या अंतरावरून माझ्याकडे बघत असलेली ती पारवा आई पुन्हा घरट्यात येऊन बसली. मग त्यादिवशी दोन पांढरीशुभ्र अंडी त्या घरट्यात विसावली, त्या दिवसापासून शक्य तितक्या वेळ पारवा आई अंडी ऊबवत, घरट्यात बसलेली असायची. बकरीला खायला टाकायला गेलं की तेवढ्यापुरती ती घाबरून उडायची. बाजूला झालं की लगेच घेऊन बसायची. मी अहिल्याला पारवा आई, तिचं घरटं लांबुनच दाखवलं. अहिल्या त्याला सुरुवातीला कबूतर म्हणाली, नंतर तीला पारवा ओळखू यायला लागला. ती पारवा आई आली… पारवा आई आली म्हणत, त्या पक्षावर लक्ष ठेवत होती. मला कुतूहल होतं की तिची अंडी कशी आहेत, ती बसते कशी? हे मला बघायचं होतं पण त्यासोबत तिला त्रासही द्यायचा नव्हता. म्हणून एकदा बकरीला खायला घालायला गेलो असता, पारवा आई उडून गेली आणि मी गपचूप मोबाईलचा व्हिडिओ ऑन करून मोबाईल तिथे लपवून ठेवून आलो. साधारण तासाभराने पुन्हा तीकडे चक्कर मारायला गेलो पारवा आई उडून गेली. ती संधी साधुन मोबाईल उचलला आणि मला पारवा आईचं शूटिंग मिळालं. ते फुटेज बघुन, मी पारव्याशी जोडला गेलो, मला उत्सुकता होती 21 दिवसानंतर त्या अंड्यातून पिल्ले येताना, बघायचं होतं, ते अहिल्याला पण दाखवायचं होतं. माझी शेजारी या नात्याने त्या पारवा फॅमिलीचा सहवास मला या कोरोनाच्या काळात फार जवळचा वाटत होता. आज संध्याकाळी असंच बकरीच्या गोठ्यात तीला गवत टाकायला गेलो असताना, तिथे पारवा काय नव्हता. यावेळी तर पारवा आई नक्कीच घरट्यात असायला हवी होती. मग कुठं गेली? जवळपासच्या तिच्या नेहमीच्या बसण्याच्या जागा बघितल्या, तिथेही दिसत नव्हती म्हणून जरा, घरट्याजवळ गेलो…… मला वाटतं कावळ्याने त्याचं काम केलं होतं. तिच्या अंड्यांची टरफलं, त्या घरट्यात विस्कळीत होऊन पडली होती. घराच्या काड्या विस्कटल्या होत्या. मी तिथून बाहेर पडलो आणि पारवा आईची फडफड ऐकू आली. जवळच्या झाडावर ती अस्वस्थपणे इकडून तिकडे उडत होती. कदाचित तिने तिची अंडी खाताना, त्या पक्षाला बघितलं असावं, कारण तिच्या नेहमीच्या आवाजापेक्षा आर्त सुर ऐकु येत होता. गेले एक-दोन आठवडे या माझ्या नवीन शेजाऱ्याला मी बघत होतो, त्याच्या हालचाली टिपत होतो. अगदी ओळखीचा झाला होता तो, पण निसर्गनियमाने या अन्नसाखळीत, त्याला त्याची पुढची पिढी उभी करण्यात यावेळेस काही यश आलं नव्हतं. त्या पारवा इतकाच मीही दुःखी होतो. मी एकटक, पारवा आई बसलेल्या फांदीकडे बघत होतो. ती बराच वेळ त्या घरट्याकडे बघायची. तिची नजर माझ्याकडे वळत होती, जणू ती मला काही सांगू बघत होती, फांदीवरून तिने जी काही उडान घेतली ती मला नव्या सुरुवातीची आशा वाटत होती. ती नकळत मलाही ही गोष्ट सांगून गेली, थांबत तर काहीच नाही. प्रत्येक शेवटाला, एका सुरुवातीची तयारी असते. मी आता फक्त बकरीलाच गवत टाकून मागे फिरतो आणि माझ्या कामाला नव्याने सुरुवात करतो.
मनोज हाडवळे