महाराष्ट्रातील पर्यटन विकास वेगाने होत असताना, वेगवेगळ्या पर्यटन संकल्पना नव्याने रुजत असताना त्यातील महिलांचा सहभाग कसा आहे हे जाणुन घेणे महत्वाचे आहे. मध्यंतरी डीडी सह्याद्रीवरील “सखी सह्याद्री” या कार्यक्रमात माझी याच विषयावर मुलाखत झाली होती. फोन इन कार्यक्रम होता त्यामुळे महाराष्ट्रभरातून विविध विषयांवर प्रश्न विचारले गेले. त्याचा गोषवारा याठिकाणी देत आहे. स्त्री आणि व्यवस्थापन हे दोन समानार्थी शब्द आहेत, एखाद्या स्त्रीला उपलब्ध साधनसामग्रीत आपला घर संसार नेटाने करता येतो, हे उत्तम प्रतीची व्यवस्थापन कौशल्य असल्याशिवाय शक्य होत नाही. कुठल्याही प्रकारचे पर्यटन असो त्याचे व्यवस्थापन हा गाभा जर स्त्री च्या हातात असेल तर ते पर्यटन उत्तम प्रकारे चालु शकते. पर्यटनात एखाद्या स्त्री चा सहभाग कुठे कुठे असू शकतो हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला त्याला माझे उत्तर होते कि पर्यटनातील कुठल्याही क्षेत्रात स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते. मला एक प्रश्न विचारण्यात आला होता कि, स्त्रीने पर्यटनात काम करायला काही वेगळे शिक्षण घ्यावे लागते का तसेच वयाची अट काय आहे? मुळात पर्यटन करण्यासाठी कल्पकता गरजेची आहे, मुलभूत माहितीसोबत कामाच्या अनुभवातून इतर गोष्टींचे आकलन होत जातेच. पर्यटनच काय पण कुठल्याही क्षेत्रात काम करण्यासाठी त्या क्षेत्राविषयी मुलभूत माहिती हवी, मुलभूत शिक्षण हवे पण अमुक अमुक शिकले तरच पर्यटनात काम करता येईल आणि नाही शिकले तर येणार नाही असे होत नाही. वयाचा विचार करता, पर्यटनात काम करायला वयाची अट नाही. ग्रामीण भागातील महिलांना पर्यटनातील संधी कोणकोणत्या आहेत याचा विचार करता ग्रामीण भागात कुठल्या प्रकारचे पर्यटन होत आहे ते आधी अभ्यासावे लागेल. तसेच ग्रामीण भागातील विविध महाविद्यालयांमध्ये पर्यटनाविषयी चे अभ्यासक्रम चालविले जातात, ग्रामीण भागातील मुलींना भविष्यात पर्यटन क्षेत्रातल्या संधींचा फायदा घ्यायचा असेल तर अशा अभ्यासक्रमांच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणींना पर्यटनातील रोजगार उपलब्ध होऊ शकतील. ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटन, निसर्ग पर्यटन, ग्रामीण पर्यटन अशा प्रकारच्या पर्यटन संकल्पना रुजत आहेत. एखाद्या कृषी पर्यटन केंद्राचे पूर्ण व्यवस्थापन एकटी स्त्री पाहू शकते. कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्रामध्ये असणारे घटक मग त्यामध्ये आदरतिथ्य आले, खाण्यापिण्याची व्यवस्था आली, राहण्याची व्यवस्था आली, फिरण्याची व्यवस्था आली, पाहुण्यांना खरेदीसाठी लागणाऱ्या ग्रामीण बाजाच्या वस्तुंची निर्मिती आली इ इ गोष्टी या स्त्रीच्या अख्यातरीत येऊ शकतात. कृषी पर्यटन केंद्र हे ग्रामीण संस्कृतीचा आरसा असते, मग आलेल्या पर्यटकांना काहीबाही शेतमाल तसेच ग्रामिण वस्तु विकत घ्यायची इच्छा असते. स्त्रिया त्यांच्या बचत गटांच्या माध्यमातून लोणची, पापड, कुरडई, शेवई, खारवडा, सांडगे यांसारखे वाळवणाचे पदार्थ तयार करू शकतात. तसेच शेतातील ताजा भाजीपाला विक्रीसाठी ठेवू शकतात. याचसोबत स्त्रियांनी काही हस्तकला आत्मसात केल्या तर त्याचाही फायदा त्यांना वस्तु तयार करायला होईल. पैठणी साडी हि आपली संस्कृती आहे, आजकाल साड्या वापरण्याचे प्रमाण कमी झालंय मग या पैठणी साडीचा उपयोग मोबाईल पाऊच, पर्स बनवायला केला तर त्याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि मिळत आहे. गोधडी हि आपली परंपरा आहे, आपण कल्पकता लढवून विविध आकाराच्या, नक्षीकामाच्या गोधड्या तयार करून विक्रीसाठी ठेवल्या तर आलेली पर्यटक मंडळी त्या नक्कीच विकत घेतील. पर्यटन क्षेत्रात काम केल्याने महिलांच्या व्यक्तिमत्व विकासात सकारात्मक बदल घडतो. आलेल्या पाहुण्यांशी चर्चा केल्याने नवीन गोष्टींचे आकलन होते, धीटपणा वाढीस लागतो, जगामध्ये काय चाललाय हे कळायला मदत होते आणि आपसुकच या सर्वात आपलं स्थान काय आणि आपलं स्वप्न काय याचा विचार करून मेहनत घेण्याची वृत्ती वाढीस लागते. मुळात स्त्री आणि पुरुष असा भेद करणेच चुकीचे, दोघांनाही समान संधी आहेत. अशा प्रकारचा सामाजीक संदेश महिला आपल्या कृतीतून देऊ शकतात. अजून तरी फ़क़्त महिलांनीच चालविलेले पर्यटन केंद्र माझ्या ऐकिवात नाही, पण खरच जर असं झालं तर त्या केंद्राची दाखल वेगळ्या प्रकरे घेतली जाईल यात शंका नाही.
मनोज हाडवळे
अध्यक्ष
जुन्नर पर्यटन विकास संस्था.